ऑनलाइन शिक्षण घेतांना..
ऑनलाइन शिक्षण घेतांना...
किरण दशमुखे,सटाणा(नाशिक)
B.Sc.,B.Ed.,M.A.,M.Phil.,D.S.M.
बदल हा निसर्गाचा नियम आहे. काळाच्या गतीनुसार माणूस किंवा इतर प्राणी स्वतःमध्ये बदल करीत आला आहे म्हणून ते आज टिकून आहेत. ज्यांनी बदलाचा स्वीकार केला किंवा बदलाला सामोरे गेले ते आपणास प्रगतीपथावर दिसून येत आहेत.ज्यांनी निसर्गाच्या बदलाचा विरोध केला असे प्राणी संपुष्टात आले आहेत. मानव प्राणी हा सर्वात बुद्धिमान असल्याने तो निसर्गाच्या आव्हानाला योग्य प्रकारे तोंड देण्यास सिद्ध होतो. जगभर कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असल्याने माणसाचे जगणे ठप्प झाले आहे. अनेक जण कोरोनाच्या तडाख्याने मृत्युमुखी पडले आहेत. पण थांबेल तो माणूस कसला! माणसाने आपले व्यवहार ऑनलाइन पद्धतीने चालू ठेवले. लाखो बालकांचे शिक्षण थांबले. काही काळ शिक्षणाची चाके थांबली असली तरी ऑनलाइन पद्धतीने पुन्हा विद्यार्थ्यांना शिक्षण देणे चालू झाले आहे. ज्यांनी या बदलाचा स्वीकार केला त्यांच्या मुलांमध्ये समाधानकारक प्रगती दिसून येत आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमासाठी अनेक प्रकार सध्या मोबाईलवर उपलब्ध आहेत. त्यातील झूम मीट, गुगल मीट यासारखे प्रकार प्रचलित आहेत.
जवळपास सगळ्याच शाळांनी या माध्यमातून विद्यार्थ्यांना निरंतर शिक्षण देणे चालू ठेवले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पालकांनीदेखील ऑनलाईन शिक्षणासाठी पुढाकार घेतला असल्याचे दिसून येते.
ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारे तंत्रज्ञान पालक व विद्यार्थी यांनी चांगले अवगत केल्याचे दिसून येत आहे. मात्र याबरोबरच विद्यार्थी व पालक यांना तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून अधिक साक्षर करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ ऑनलाइन शिक्षण वर्ग चालू असताना विद्यार्थी व पालकांनी काही काळजी घेणे आवश्यक आहे ती खालील प्रमाणे...
बऱ्याच जणांची तक्रार असते,आमच्याकडे रेंज मिळत नाही.नेटवर्क चांगले नसते.यावर तक्रार करीत बसण्यापेक्षा उपाय शोधला पाहिजे.यासाठी आपण आपल्या परिसरात कोणत्या मोबाईल कंपनीचे नेटवर्क चांगले चालते याचा तपास करावा.तुम्हाला तोच नंबर कायम ठेऊन त्या कंपनीत तो नंबर पोर्टेबिलिटी म्हणून ट्रान्स्फर करता येतो.तो करून घ्यावा.सर्व कंपन्यांची पॅकेज जवळपास सारखीच असतात.मात्र आपला नेटवर्क न मिळण्याचा त्रास वाचतो.
ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून एक प्रकारे आपण "व्हर्च्युअल क्लासरूम" मध्ये बसलेलो असतो. या माध्यमातून आपल्याला जसे इतरांना पाहता येते, ऐकता येते तसेच इतरही पार्टीसिपेंट्स आपल्याला पहात व ऐकत असतात. या दृष्टीने आपली वर्तणूक असणे आवश्यक आहे. कॅमेऱ्यासमोर बसताना आपला वेष,हावभाव व्यवस्थित असावेत. कॅमेराच्या समोर येणाऱ्या घरातील व्यक्ती देखील स्क्रीनवर येतात. त्यांचे आवाज देखील ऐकू येतात. तेव्हा अशावेळी पालकांनी त्या मुला जवळ शांतता राहील हे पहावे. विद्यार्थ्यांनी देखील आवश्यकता नसताना आपला ऑडिओ एवढेच नव्हे तर व्हिडिओ देखील बंद ठेवावा. शिक्षक सांगतील तेव्हा किंवा गरज असेल त्यावेळी ऑडिओ-व्हिडिओ चालू करावा.
लहान वर्गाचे पालक तर मुलांसोबतच ऑनलाइन मोबाईल समोर अभ्यासाला बसतात. इथपर्यंत ठीक आहे ;मात्र ते मुलाला सारख्या सारख्या सूचना देऊन त्याचे शिक्षकाप्रती असलेले अवधान विचलित करतात. त्याला बिचाऱ्याला कळत नाही की ,त्याने पालकाचे ऐकायचे की शिक्षकाचे ? तो संभ्रमात पडतो. एकाच वेळी दोन मार्गदर्शक नकोत. यामुळे त्याचे अभ्यासावरील कॉन्सन्ट्रेशन लूज होते. ऑनलाइन वर्ग संपल्यानंतर तुम्ही त्याचा अभ्यास घेऊ शकता. त्याला आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करू शकता. बऱ्याचदा असे अनुभवास आले आहे की,विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणास बसला ही पालक त्याला एवढ्या सूचना देतात व धाकदपटशा करतात, की मुलांचे मन एकाग्र होऊ शकत नाही.तो घाबरून जातो.यामुळे तो योग्य प्रकारे ज्ञानार्जन करू शकत नाही. काही मुलांना प्रत्येक वेळी पालकांची मदत घेण्याची सवय यामुळे जडली आहे. शिक्षकांनी काही प्रश्न विचारला की पालक मुलाला विचारही करू न देता ताबडतोब रेडीमेड उत्तर सांगतात.त्यांना वाटते आपल्या मुलाने सर्वात प्रथम उत्तर दिले पाहिजे.मात्र यामुळे मुलांची विचार करण्याची क्षमता मारली जाते आहे. एक वेळ मुलाला उत्तर देता आले नाही तरी चालेल, पण आपण अशा प्रकारचा टेकू देऊन काय प्राप्त करीत आहोत? दररोज चा वर्ग म्हणजे काय स्पर्धा परीक्षा नव्हे की त्याला मोठे बक्षीस मिळणार आहे. ती खरे तर त्याचे जीवन घडवण्याची पाठशाळा आहे यातूनच तो घडत जातो. मुले चुका करतात, तेव्हा ती शिकत असतात. चुकीचे उत्तर दिले म्हणून मुलांना कुठलेही वाईट वाटत नाही. मात्र पालकांचा इगो दुखावला जातो.खरे लक्षात घेतले तर यामुळे काहीच बिघडत नाही.मुले चुकांमधून स्वतः शिकत असतात. ज्ञानग्रहण करत असतात. तेव्हा पालकांनी ऑनलाईन क्लासमधील आपली भूमिका केवळ निरीक्षकाची ठेवावी. मार्गदर्शकाची नको. त्यानंतर मात्र मार्गदर्शन जरूर करावे.
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मागील वर्षी हे सर्व नवीनच असल्याने अनेक पालकांनी मोबाईलवरील शिक्षणाला विरोध दर्शविला. पर्यायाने ती मुले आज मागे पडलेली दिसून येत आहेत. आज यातील काही पालक ऑनलाइन शिक्षणाला तयार झाले आहेत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे,तंत्रज्ञान वाईट नाही त्याचा अतिरेक वाईट आहे. जी मुलं तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करू शकणार नाहीत,ती भविष्यात निश्चितच मागे पडतील. तेव्हा मोबाईल मुळे मुले बिघडतात असे कारण पुढे करणाऱ्या पालकांनी आपल्या स्वतःचा मोबाईलचा वापर तपासून पाहावा. मुले अनुकरणातून शिकतात.आपण जर मोबाईलचा यथायोग्य वापर करत असाल, तर मुलेदेखील तुमचे अनुकरण करतील. मुलांना चांगले काय वाईट काय हे समजून सांगण्याची जबाबदारी पालकांची आहे. शिक्षक तर याबाबतीत नेहमीच सांगत असतात आणि त्यांच्या सांगण्याचा मुलांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे नेहमीच दिसून येते. तेव्हा मोबाईल हे उपकरण केवळ अभ्यासासाठी आहे,मनोरंजनासाठी नाही हा विचार जर मुलांच्या मनावर बिंबवला, तर ते या माध्यमाचा उपयोग आपल्या शैक्षणिक उन्नतीसाठी करून घेतील,यात कुठलीही शंका नाही.
अजून एक महत्त्वाची गोष्ट या काळात सर्वत्र वादग्रस्त ठरली आहे आणि ती म्हणजे ऑनलाइन शिक्षण शाळांनी फुकट दिले पाहिजे.अशी पालकांची मानसिकता बनली आहे. मूल जर शाळेत जात नाही तर फी कशी भरायची? हा जो गोड गैरसमज पसरला आहे तो काहीशा अज्ञानाचा भाग म्हणावयास हवा. आपण जर शिक्षकांच्या भूमिकेत जाऊन ते करीत असलेल्या ऑनलाईन विद्यादानाचे स्वरूप व कार्य प्रणाली समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल की शिक्षकांच्या दृष्टीने "ऑनलाइन टिचिंग" हे ऑफलाईन शिक्षणापेक्षा जास्त त्रासदायक व वेळखाऊ आहे. ऑनलाईन तास घेण्याअगोदर प्रत्येक शिक्षकाला त्या पाठावरील प्रश्नांची पीपीटी (presentation)तयार करावी लागते. काही फोटो किंवा चित्रे घ्यावी लागतात. प्रश्न उत्तरांसाठी पीडीएफ तयार करावी लागते. तशाच प्रकारचे,आशयाचे विविध व्हिडिओ, युट्युब वर जाऊन सर्च करावे लागतात. ते स्वतः पहावे लागतात. आणि मग ऑनलाइन शिक्षणात मध्ये आवश्यकतेनुसार शेअर करावी लागतात. हा सर्व गुंता खूप मोठा आहे. शिक्षक ४० मिनिटे शिकवतो म्हणजे संपले असे नाही.त्यापूर्वी त्याला तास,दोन तास पूर्वतयारीसाठी खर्च करावे लागतात. हे किती जणांना माहित आहे?आणि म्हणून ऑनलाइन शिक्षणाला कमी न लेखता ती काळाची गरज समजून आपण आता पुढे सरसावले पाहिजे. केवळ शाळा चालू होण्याची वाट पहात बसले तर आपले मुल प्रवाहातून मागे पडेल.त्याचे शिक्षण काही काळ का होईना थांबून जाईल. यासाठी प्रत्येक पालकांनी जागरूकपणे मुलाच्या शिक्षणाची काळजी घेतली पाहिजे. मुलाची शाळा, त्याचे शिक्षक यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. शिक्षक व डॉक्टर यांच्यावर जर आपला विश्वास नसेल तर आपण त्यांच्याकडे न गेलेलेच बरे. कोणत्याही शिक्षकाला विद्यार्थ्यांचे नुकसान व्हावे असे कधीच वाटत नाही. तो नेहमीच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटत असतो.तेव्हा आपण जर प्रवाहाच्या बाहेर असाल,तर अजूनही वेळ गेलेली नाही.लवकरात लवकर शिक्षण प्रवाहात सामील व्हा.बालकांचे शिक्षण निरंतर चालू ठेवा.ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
मो.9420889575
Comments