एका नव्या क्रांतीची गरज...
एका नव्या क्रांतीची गरज..
किरण दशमुखे,सटाणा
८ ऑगस्ट हा दिवस देशभर क्रांती दिन म्हणून दरवषी साजरा केला जातो. आपण बघितले असेल क्रांती ही सामान्य माणसांनी केलेली आहे. धनदांडग्या व भरलेल्या पोटांच्या लोकांनी क्रांती केली नाही. देश गुलामीत असताना त्यांनी गोऱ्या इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वराज्य मिळाले पण सुराज्या चे काय?
आज मात्र आपल्याला आपल्याच काळया इंग्रजांविरुद्ध क्रांती करायची गरज आहे.
आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत.हा आनंद लुटत असताना आपण थोडे इकडे तिकडे देखील पाहिले पाहिजे.आपल्या आजूबाजूला कित्येक गरीब लोक अजूनही हलाखीचे जीवन जगत आहे.त्यांच्या जीवनात अजून दारिद्य्र,अज्ञान,रूढी परंपरा यांचा अंधारच आहे.त्यांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट अजून उगवलीच नाही.काय त्यांच्याही झोपडीत आपल्या वाटचा स्वातंत्र्य सूर्याचा उजेड पेरण्याची गरज आपल्याला वाटत नाही?स्वातंत्र्याचा आनंद काय फक्त आपण एकट्यानेच लुटायचा?स्वातंत्र्य ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.प्रश्न आहे तो आपण ती तेवढ्या जबाबदारीने पेलतो का याची?
आज एवढी वर्ष झाली तरी देखील सामान्य माणूस सरकारी कर्मचाऱ्यां कडून गुलामा सारखाच वागवला जात आहे. याला काही चांगले लोक अपवाद आहेत.
मात्र सरकारी कार्यालयात लाच घेतल्याशिवाय कुठलाही कागद दिला जात नाही. भरपूर चकरा मारायला लावतात.
सामान्य माणूस या मुळेच अगदीच मेटाकुटीला येतो. वजन ठेवलं की फाईल पुढे सरकते. हा कुठला न्याय आहे गरीब अधिक गरीब होत चाललाय आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललाय.
मित्रांनो इथेच क्रांतीची खरी गरज आहे. तरुणांपैकी किती जणांना या गोष्टीची चीड येते. वाटतं की आपल्या मायबापावर अन्याय होतो आहे.तो या काळया इंग्रजांच्या भ्रष्ट प्रशासना खाली भरडला जातोय. मेटाकुटीला येतोय. त्याचे जीवन दुः खी होतेय. कष्टमय होतेय. किती तरुणांना याची चीड येते...?
नाही आम्हाला हे सगळं सहन करण्याची परंपरागत सवयच लागून गेली आहे.
हे सगळे पाहून ऐकून आमचे रक्त सळसळत नाही.उसळत नाही. ते उसळते, ग्लासमधल्या बियर बरोबर. रस्त्यावरती अंधारात केक एकमेकांच्या तोंडाला फासतांना. बापाच्या मोटरसायकलवर गावभर हिंडतांना.
तिथेच आम्ही आमची शक्ती वाया घालवत आहोत.
किती तरुणांना वाटते की भ्रष्ट अधिकाऱ्याला घरी पाठवावे. गरिबाला न्याय मिळवून द्यावा. जर खरोखरच तुमच्यामध्ये शिवरायांचे तेज असेल, राजांचा प्रताप असेल,स्वराज्याचा इतिहास तुमच्या डोळ्यापुढे असेल तर,...असे मावळे तयार व्हा.
या भ्रष्ट इंग्रजांच्या विरुद्ध सापळा रचा. ज्या प्रमाणे अतिरेक्यांना दिसताक्षणी गोळ्या घाला म्हटले जाते.तसे यांना लाच मागता क्षणी पकडून द्या.कायदा हातात घेऊ नका.मात्र कायद्याने यांना घरी बसवा.हे समाजातील अतिरेकीच आहेत. यांना अँटी करप्शनच्या साह्याने रेड हँड पकडून द्या. ट्रॅप लावा. त्यांना घरी पाठवा. बघा गरिबाच्या चेहऱ्यावर केवढा आनंद तुम्हाला दिसेल!
हेच खरे स्वातंत्र्य असेल. हाच खरा संघर्ष आणि हीच खरी क्रांती.यासाठी तुम्ही तरुणांनी गटागटाने एकत्र या.भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेतून हाकलून द्या.यासाठी जन आंदोलन उभे करा.हे राज्य आपले आहे.सरकारातील कर्मचारी आमचे मालक नव्हे,नोकर आहेत.आम्ही खरे मालक आहोत.हे भान समाजात पेरा.भ्रष्टाचाराला शिष्टाचार बनवू नका.ही किड संपवण्यासाठी कामाला लागा.
मित्रांनो! अजून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालेलं नाही. स्वराज्य आलेलं नाही. या काळया इंग्रजांना जेव्हा तुम्ही त्यांची जागा दाखवाल, गरिबाच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल, जेव्हा त्याच्या अधिकाराचे त्याला मिळेल.
तेव्हाच खरी स्वातंत्र्याची पहाट झाली असे म्हणता येईल.तेव्हा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातला, मासाहेब जिजाऊ नी सांगितलेला हा महाराष्ट्र स्वराज्या मध्ये आला असे म्हणता येईल.
जय शिवराय!जय जिजाऊ! जय महाराष्ट्र!!!
Comments