माझे पहिले भाषण

  * माझे पहिले भाषण *

किरण दशमुखे,सटाणा

माझे वडील प्राथमिक शिक्षक असल्याने आणि ज्या गावाला बदली त्याच गावात राहायचे असे त्यांचे धोरण असल्याने माझे संपूर्ण शालेय शिक्षण खेडेगावातच झाले. तेथे अर्थातच सुविधांची वानवा होती. मात्र तरीही शाळेत महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त शिक्षक मला भाषण करायला सांगत. कधीकधी शिक्षकांच्या घरी जाऊन मी कागदावर भाषण लिहून ते पाठ करून दुसऱ्या दिवशी शाळेत, वर्गात मुलांसमोर बोलून दाखवत असे. मात्र हे सर्व शाळे पुरताच मर्यादित होते.

माझ्या भाषणाची खरी सुरुवात झाली, त्याची मात्र एक गंमत आहे. साधारण पस्तीस वर्षांपूर्वी आमच्या गावात अण्णा जगताप म्हणून एका तरुण दलित कार्यकर्त्यांने बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे ठरवले. हे गाव तसे दुर्गम भागात असल्याने तालुक्यातून या गावात यायला रस्ता देखील चांगला नव्हता. दिवसातून एक वेळच बस येत होती. तेव्हा या कार्यक्रमाला वक्ता कोणाला बोलवावे हा विचार त्यांच्यापुढे उभा ठाकला होता. मात्र कार्यकर्ते उत्साही होते आणि मागे हटणारे नव्हते. काही तरी नवीन करण्याची त्यांची उमेद होती. त्यांच्या लक्षात आले, आपल्या गावातील हेडमास्तरांच्या किरणला भाषणासाठी तयार करायचे. १४ एप्रिल १९८३ रोजी त्यावेळी मी सातव्या इयत्तेत होतो. तेव्हा असे अचानक भाषणाचे निमंत्रण मिळाले.

 संयोजक म्हणाले,आम्ही अडाणी आहोत. आमच्यापैकी कुणालाच भाषण करता येत नाही. तू ये आणि दोन शब्द बाबासाहेबांबद्दल बोल. आई-वडिलांनीही मला भाषणासाठी तयारी करण्यास सांगितले.माझ्याकडे मुलांसाठीची वाचनाची पुस्तके होतो.त्यातून मी माहिती मिळवली व भाषण लिहून काढले.आदल्या रात्री भाषणाची चांगली तयारी केली. माझ्या बाल बुद्धीप्रमाणे भाषणाचे मुद्दे काढले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव, वडिलांचे,आईचे नाव, त्यांच्या गुरुजींनी त्यांना बहाल केलेले अंबावडेकर आडनाव बदलून केलेले आंबेडकर हे आडनाव. हे सर्व सांगितले.बाबासाहेबांचे बुद्ध,कबीर व फुले हे तीन गुरू असल्याचे सांगितले.तसेच विद्या,विनय व शिल ही त्यांची तीन दैवते असल्याचे सांगितले. त्यांच्या बालपणी चे काही किस्से ऐकवले.

कार्यक्रमस्थळी मोठा सभामंडप दिलेला होता. माईकची व्यवस्था करण्यात आली होती. अंगणातच बरीचशी मंडळी मोठ्या श्रद्धाभावाने एकत्र जमलेली होती. त्या गावातील पस्तीस वर्षांपूर्वीचा तो बहुदा पहिलाच १४ एप्रिल चा उत्सव होता. मी पहिल्यांदाच माइक वर जाहीर सभेत भाषण करीत होतो.पण माझ्यासमोर कोण बसले आहे हे काही मला समजत नव्हते. माणसांच्या जागी मला फक्त पांढरे ठिपके दिसत होते. मी पाठ केलेले संपूर्ण भाषण बोललो. पण आपण काय बोलत आहोत हे मला कळत नव्हते.मी आतून घाबरलो होतो. भाषण संपल्यावर लोकांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या. त्यावेळी काही लोकांनी मला प्रेमाने जवळ घेत पाठीवर शाबासकी दिली. बहुतांश अक्षरशत्रू असलेल्या या प्रेमळ माणसांनी ३५ वर्षांपूर्वी माझ्या भाषणाचे कौतुक केले, तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आहे. एका मुक समाजाच्या नायकाने मला खऱ्या अर्थाने बोलके केले. असे होते माझे पहिले भाषण. आजही मला माझ्या पहिल्या भाषणाची आठवण आली की तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो. प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मला स्मरण होते...(प्रकशित: दै. महाराष्ट्र टाइम्स )

किरण दशमुखे,सटाणा



Comments

Popular posts from this blog

एका नव्या क्रांतीची गरज...

ऑनलाइन शिक्षण घेतांना..