सुविचार कशासाठी?

 

सुविचार कशासाठी?
इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे,"A drop of ink makes millions think." शाईचा एक थेंब लाखो लोकांना विचार करायला लावतो.एवढे लेखनाचे महत्त्व आहे. हजारो पुस्तके वाचून जे मिळणार आहे, ते एका सुविचारातून मिळते.सुविचार हा विचारांचे सार आहे. समुद्रमंथनातून ज्या प्रमाणे अमृत काढावे त्याचप्रमाणे थोरामोठ्यांच्या विचारमंथनातून सुविचार जन्माला येत असतात.सुविचारातून माणूस विचारशील व प्रेरणाशील बनतो.एक विचार माणसाला दिशा दाखवतो. प्रगतीच्या मार्गावर चालायला प्रवृत्त करतो.माणसाचा आचार हा त्याच्या विचारांवर अवलंबून असतो.जसे विचार तसा आचार.आचार म्हणजे आचरण,वर्तणूक.म्हणून चांगल्या आचारासाठी चांगले विचार महत्वाचे आहेत.हे विचार आपल्याला थोरांच्या वाचनातून मिळतात.थोर माणसे काही उगाच मोठी झालेली नसतात.ती आपल्या कार्य कर्तृत्वाने मोठयापदाला पोहोचलेली असतात.त्यांचे जगावेगळे विचार त्यांना येथपर्यंत घेऊन आलेले असतात.या संपूर्ण काळातील त्यांचे अनुभव व यातून आलेले चिंतन म्हणजेच या महान लोकांचे विचार असतात.ते आपल्यासाठी सुविचार बनतात.हेच सुविचार आपण जर अंगिकारले व त्यानुसार आपले आचरण ठेवत गेलो,तर एक दिवस आपण देखील मोठ्या पदाला पोहचू शकतो. यासाठी सुविचारांचे वाचन महत्त्वाचे आहे.
                   सुविचार हे केवळ भिंतीवर लिहिण्यासाठी नाहीत.ते काळजात कोरून ठेवण्यासाठी असतात.समुद्रात भरकटलेल्या नावेला जसा दीपस्तंभ दिशा दाखविण्याचे कार्य करतो तसेच सुविचार हे अस्वस्थ व भरकटलेल्या मनाला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य करतात. ते जीवनात मार्गदर्शक असतात. बोट धरून मार्गावर चालायला प्रवृत्त करतात.यासाठी रोज नियमित एक तरी विचार वाचायला हवा. विचार वाचल्यानंतर त्यावर चिंतन व्हायला हवे. तो मनात सतत घोळत राहिला पाहिजे;म्हणजे तो पक्का रुजतो.एकदा तो विचार मनात पक्का रुजला की, त्याची वाढ होते आणि ही वाढ माणसाच्या वर्तनाच्या विकासाची असते.
यासाठी आपल्या फावल्या वेळात, मनाच्या निवांतपणी किंवा मन अस्वस्थ असताना देखील वाचायला हवा. यामुळे मनाची व चित्ताची स्थिरता होते. एकदा मन व विचार स्थिर झाले की ते योग्य दिशेने कार्य करू लागते. कोणत्याही मोठ्या कार्याची सुरुवात मनापासून सुरू होते.माणसाचे मनच सर्वप्रथम काही ठरवते.सर्व मोठ्या कार्यांची रुजवात ही प्रथम मनात होते.त्यांचा उगम सर्वप्रथम मनात होतो ,नंतर ते कृतीद्वारे प्रकटते.प्रकट मनाची ही अवस्था विचारांवर अवलंबून असते.विचार जेवढे महान असतील तेवढे मन सकारात्मक बनते.हे सकारात्मक मन मग आपल्या मेंदुला कृतिप्रवण बनवते.यासाठी चांगले विचार म्हणजेच सुविचार आपल्या मनात असले पाहिजेत.हे विचारच मनाचे खाद्य आहे.आपले विचार आपले जीवन दर्शन घडवतात.आचार बदलण्यास प्रवृत्त करतात.म्हणूनच सदाचारी माणसाचे विचार हा त्याच्या आचाराचा पाया ठरतो.अशा महान लोकांच्या विचारातून आपणही प्रेरित होण्यासाठी त्यांचे विचार वाचणे,ते स्वतः अंगीकारणे आवश्यक असते.एकदा आपल्याला या विचारातून प्रेरणा मिळाली की आपणही आपला मार्ग बनवू शकतो.महापुरुष गेले त्या वाटेवरून आपल्याला चालण्याची संधी मिळते.आणि आपले जीवन देखील धन्य होवू शकते.
      यासाठी सुविचारांचे वाचन हवे. एकावेळी खूप सारे विचार वाचू नयेत. निवडक विचार वाचावेत.त्यावर चिंतन करावे.त्याप्रमाणे तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.म्हणजे मग आपोआपच आपली वाटचाल योग्य दिशेने होत जाईल.
सुविचार हे अमृत कलश आहेत.ते जेवढे प्राशन कराल,तेवढे तुमचे जीवन समृध्द होत जाईल.
तेव्हा आज पासून सुविचारांकडे केवळ विचार म्हणून न पाहता,तो आपल्यासाठी असलेला सदाचार आहे या दृष्टीने पाहिले, तर आपले अंतर्बाह्य जीवन बदलण्यास फार मोठा हातभार लागेल.
    

Comments

Popular posts from this blog

एका नव्या क्रांतीची गरज...

ऑनलाइन शिक्षण घेतांना..

माझे पहिले भाषण