गुणवत्तापूर्ण शिक्षण
देशातील बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी शिक्षण व्यवस्थेचे प्रमुख असलेल्या शिक्षकांनी त्या दिशेने स्वतःमध्ये काही सकारात्मक बदल घडविणे महत्त्वाचे आहे.आज शिक्षणामध्ये नवनवीन बदल येत आहेत.अनेक कृतीशील शिक्षक आपल्या कल्पकतेने या बदलांना सामोरे जात आहेत. तसेच आपल्या सृजनशक्तीने शिक्षणामध्ये आनंददायी बदल घडवून आणत आहेत. शिक्षणाची प्रक्रियाच मुळात आनंददायी असली तर मूल आपोआप शिक्षणाकडे आकर्षित होईल.मुलांचे शाळाबाह्य होण्याचे प्रमाण कमी होईल.गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास चांगले विद्यार्थी शिकून बाहेर पडतील. यासाठी शिक्षकाने नवनवीन उपाय योजना आखणे अतिशय महत्त्वाचे आहे.नव्याने शिक्षण क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या शिक्षकांसाठी काही गोष्टी पुढे दिलेल्या आहेत.यातील बऱ्याच गोष्टी शिक्षक करत असतात. मात्र शिक्षक कृतीला उजाळा मिळावा या दृष्टीने आपण काही गोष्टी जाणून घेऊ या...
१)सर्वप्रथम शिक्षक किंवा बाहेरील कुणी ज्येष्ठ व्यक्ती,पाहुणे वर्गात आल्यावर मुलांना उभे राहून गुड मॉर्निंग टीचर,गुड मॉर्निंग सर असे म्हणण्याची सवय लावावी.
२) मुलांना विशिष्ट अंतरावर शिस्तबद्धतेने बसवावे.
३) दररोज वेळच्या वेळी नियमितपणे हजेरी घ्यावी.
४) एखादा विद्यार्थी सलग दोन दिवसापेक्षा अधिक काळ गैरहजर असल्यास त्याच्या पालकांशी संपर्क साधावा. त्याच्या गैरहजेरीचे कारण समजून घ्यावे.
५) मुलांना काही कारणाने गैरहजर राहायचे असल्यास त्यांनी त्यापूर्वी तशी सूचना शिक्षकांना देण्याची सवय लावावी.
६) मुल न विचारता गैरहजर राहिल्यास पालकांकडून त्याच्या गैरहजेरीच्या योग्य कारणाची चिठ्ठी (leave note) आणण्यास सांगावी.
७) पूर्व प्राथमिक किंवा पहिलीच्या वर्ग शिक्षकांनी घरून तयार करून आणलेल्या वह्या वाटाव्यात.या काळात विद्यार्थी त्यांचे ते लिहितील असे न करता लक्ष पुरवावे. चुकीच्या पद्धतीने लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यास योग्य पद्धतीने लिहून दाखवावे. अधिक मुले चुकीच्या पद्धतीने लिहीत असल्यास योग्य पद्धतीने फळ्यावर लिहून दाखवावे.
७) मराठी व इंग्रजी मुळाक्षरे लिहिण्याचा क्रम लक्षात घ्यावा. योग्य मार्गदर्शक पद्धतीने मुळाक्षरांचे लेखन झाले पाहिजे. त्यासाठी अंकलिपीमध्ये प्रत्येक मुळाक्षराच्या लेखनाची पद्धती १,२,३,४ या क्रमानुसार दिली आहे. त्यानुसारच मुळाक्षर गिरवले पाहिजे. ही गोष्ट कटाक्षाने मुलांना शिकवावी.
८) मुले निव्वळ लिहून वह्या भरतात.काही वेळा आपण काय लिहितो हे त्यांना कळत नाही,यासाठी लिहिताना प्रत्येक वेळी त्यांना तो शब्द बोलून लिहिण्यास सांगावे, म्हणजे मुलाच्या लक्षात राहते.त्याला शब्दाचे आकलन होते.
९) मुलांच्या लेखनाच्या चुका वेळी सुधाराव्यात. तसेच उच्चार देखील योग्य पद्धतीने करतो की नाही हे बघावे.
१०) चुकीच्या लेखनाला बरोबर देऊ नये वह्या तपासताना घाई करू नये. काटेकोरपणे तपासाव्यात. चुकीची गोष्ट लगेच दुरुस्त करून घ्यावी. मुलाच्या लक्षात आणून द्यावी. प्राथमिक शाळेतील मुल हे काही महाविद्यालयीन विद्यार्थ्याप्रमाणे प्रगल्भ नसते, ते समजून घेईल असे करू नये. त्याला जवळ बोलावून चूक लक्षात आणून द्यावी.
११) सर्व विद्यार्थ्यांचे वर्कबुक नियमित नियोजनानुसार भरून घ्यावेत. गृहपाठाच्या वह्या वेळच्यावेळी तपासाव्यात. विद्यार्थ्याने गृहपाठ केला नसल्यास योग्य ती समज द्यावी.सौम्य शिक्षा करावी.
१२) सर्व विद्यार्थ्यांना एकाच प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा. खूप पुढे जाण्याची घाई नसावी अगदीच मागेही राहू नये शिकवण्याचे नियोजना असावे मासिक, तिमाही, सहामाही नियोजन करावे.
१३) प्रत्येक मुलाला अक्षर ओळख असली पाहिजे. यासाठी फळ्यावर सराव घ्यावा.आपण वाचून दाखवावे. मुलांना आपल्या मागे म्हणावयास लावावे. यासाठी खूप ओरडण्याची गरज नाही. सामान्य आवाजात वर्गातील प्रत्येक मुलास ऐकू येईल इतपत आवाजात वाचावे.
१४) वर्गातील हुशार मुलाकडून फळ्यावरील वाचन करून घ्यावे व इतर मुलांना त्यामागे म्हणावयास लावावे. शक्यतो मुलांना शालेय वेळात रिकामी ठेवू नये. शिक्षक जर वर्गात निष्क्रिय राहिला तर मुले कंटाळतात.परिणामी त्यांच्या मनात अध्ययनाबद्दल आवड राहत नाही. त्यांना शालेय शिक्षण कंटाळवाणे वाटायला लागते. यासाठी मुलांना सतत विविध गोष्टी अवलंबून कार्यरत ठेवावे. एकच एक गोष्ट करून विद्यार्थी कंटाळल्यास कामात बदल करावा.change of work is the rest. ही गोष्ट लक्षात घ्यावी.
१५) मुले लवकर शिकतात त्याचप्रमाणे लवकर विसरतात देखील, यासाठी आज घेतलेला घटक पुन्हा उद्या देखील घ्यावा.थोड्या अधिक वेगाने घ्यावा. सर्वांना अवगत झाले असे लक्षात आल्यावर पुढे जावे. पुन्हा काही दिवसांनी रिव्हीजन घ्यावी. यामुळे तो घटक अधिक दृढ होतो.
१६) मुलांशी आत्मीयतेने बोलावे. त्याला आपली भीती वाटणार नाही या दृष्टीने त्याचा विश्वास संपादन करावा.
१७) शिक्षक हा विद्यार्थ्यांचा 'मालक' नाही तर ' पालक ' असतो या दृष्टीने आपली भूमिका असावी. मुलांना आपल्या शंका अडचणी आपल्याशी शेअर कराव्याशा वाटल्या पाहिजेत. शिक्षकाबद्दल त्यांना जिव्हाळा व प्रेम वाटेल असे आपले वर्तन असले पाहिजे.
१८) मुलांना चांगल्या सवयी समजून सांगाव्यात.त्यांना वळण लावावे. या गोष्टी नियमितपणे सांगाव्यात. (म्हणजे रोज नव्हे) मूल या वयात पालकांनी सांगितलेले नव्हे,तर शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टीचे अधिक तत्परतेने पालन करतात. त्यांचा विश्वास पालकांपेक्षा देखील शिक्षकावर अधिक असतो. मूल शिक्षकाला आपले आदर्श मानत असते.
१९) मूल पालकांचे नव्हे तर शिक्षकाचे अनुकरण करते. या दृष्टीने मुलांसमोर आपली वर्तणूक आदर्श असावी. नेहमी प्रसन्न, हसतमुख रहावे. त्रासिक मुद्रेने वावरू नये.
२०) service to God या दृष्टीने बालकांकडे बघावे. असे झाले तर मुले आपणास एवढे प्रेम देतील की त्यांचे आशीर्वादाचे कवच आपल्या भोवती तयार होऊन आपण सर्व संकटावर मात करण्यास सिद्ध होतो.
२१) शिक्षकाने आपले ज्ञान अद्यावत करीत राहिले पाहिजे. आपण वयाने मोठे असलो तरी काही वेळा मूल ज्ञान किंवा माहितीने मोठे ठरते. अशावेळी त्यांच्याकडील माहितीचा देखील आपण सन्मान करायला शिकले पाहिजे. मुले काय प्रश्न विचारू शकतात हे धोके ओळखले पाहिजेत. त्यानुसार आपण तयारीत असले पाहिजे.
२२) आत्मविश्वासाने शिकवावे. त्यासाठी आपली तयारी पक्की असली पाहिजे. आपण आपल्या ज्ञानाबाबत ठाम असलो तरच ते ज्ञान विद्यार्थी आत्मसात करतात. अन्यथा किती ही ओरडून शिकवले तरी ते ज्ञान निष्फळ ठरते.
२३) बालकांना बडबड गीते, राईम्स,गोष्टी आवडतात. या गोष्टी दररोज झाल्या पाहिजेत. त्यासाठी शिक्षकाला ताला सूरात कविता म्हणता आली पाहिजे.गोष्ट छान शब्दात रंगवून सांगता आली पाहिजे. शक्य असल्यास अभिनय देखील करता आला पाहिजे. प्रवचन नको.बालकांचा सहभाग घेऊन पुढे जावे, शिक्षकाने मुलात मूल व्हावे. रंजक पद्धतीने अध्ययन अध्यापन झाले पाहिजे.
२४) चुकीचे वर्तन केल्यास बालकाला रागवावे. मात्र हा राग मातृ हृदयी असावा.त्याला शारीरिक शिक्षा करू नये.पुन्हा त्याला चूक लक्षात आल्यास प्रेमाने जवळ घ्यावे. पाठीवर हात ठेवून अशी चूक करू नकोस म्हणून प्रेमळ शब्दात समजून सांगावे.
२५) उद्या काय शिकवायचे याचे नियोजन नसल्यास आपली गती समुद्रात भरकटलेल्या नावे सारखी होते, यामुळे तसे करू नये. पूर्वनियोजन असेल तर त्यानुसार आपण शैक्षणिक साहित्य तयार करू शकतो. यामुळे अध्ययन अध्यापनात खूपच प्रभावीपणा येतो.
२६) आपल्यासमोर बसलेली बालके किलकिल्या डोळ्यांनी आपल्याकडे आशेने बघत असतात. ते चातकाप्रमाणे ज्ञानबिंदू प्राशन करण्यासाठी उत्सुक असतात. आपण आपल्या उदासीनतेने त्यांचा अपेक्षाभंग करू नये.
" या कोवळ्या कळ्या माजी,
लपले नरेंद्र,ज्ञानेश्वर,शिवाजी!" ही गोष्ट लक्षात घ्यावी.
२७) सर्वात शेवटी जर तीन चार पाच वर्षाचे बालक ज्ञान अर्जन करू शकते, तर आपण का नाही ? आत्मविश्वास वाढवला, आळस झटकला, निष्काळजीपणा कमी केला, तर सर्व काही सहज शक्य आहे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी कुठल्याही वयाचे बंधन नसते. माणूस हा जीवन विद्यार्थी असला पाहिजे.
२८) चला तर मग, नवीन पिढी घडवण्यासाठी सज्ज होऊ या!
किरण दशमुखे
(बी.एस्सी.,बी.एड., एम.ए.,एम. फिल., डी.एस.एम.)
मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद विद्यालय,सटाणा(नाशिक)
मो.9420889575
Comments